क्षेत्रीय

Blog single photo

औरंगाबाद पर्यटन विकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार

13/02/2020

औरंगाबाद, 13 फेब्रुवारी (हिं.स.): आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे महत्वपूर्ण स्थान आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील  सर्व  पर्यटन स्थळांच्या   विकास कामांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे अशवासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांनी औरंगाबाद करांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांच्या आढावा बैठकीत  मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी, दि.13 रोजी बोलत होते. या बैठकीला  पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह खा.इम्तियाज जलील,आ.अंबादास दानवे,महापौर नंदकुमार घोडेले,जिल्हाधिकारी उदय चौधऱी , महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यासह इतर सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व  पर्यटन स्थळी पूरक सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. जेणेकरुन पर्यटक संख्येत वाढ होऊन येथे रोजगाराच्या संधी विस्तारण्यास चालना मिळेल. त्यादृष्टीने  पर्यटन स्थळांच्या विकासकामाला कालमर्यादेत गुणवत्तापूर्णरित्या पूर्णत्वास न्यावे असे सांगूण मंत्री ठाकरे यांनी वेरुळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातंर्गत करण्यात येत असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. वेरुळ घृष्णेश्वर याठिकाणी संयुक्त बायपास रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 22 कोटींचा निधीच्या  नियोजन विभागाकडे पाठवलेल्या  प्रस्तावाचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या बायपास रस्तयामुळे येथील वेरुळ अभ्यागत केंद्राला भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.तसेच दौलताबाद किल्ल्याच्या बाहेर असलेल्या ऐतिहासीक दरवाज्याच्या बाजूने रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीकरीता राज्य तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे मंत्री ठाकरे यांनी  यावेळी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार 
 


 
Top