राष्ट्रीय

Blog single photo

जगत प्रकाश नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

20/01/2020

नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रमुख खासदार राधा मोहन सिंह यांनी ही अधिकृत घोषणा केली. यावेळी मावळते राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नड्डा यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. हा कार्यकाळ तीन वर्षासाठी आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात नवीन अध्यक्ष पदासाठी राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव सोमवारी सादर करण्यात आला. 

 2 डिसेंबर 1960 साली बिहारच्या पटना येथे जन्म झालेले नड्डा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. मात्र त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास मात्र हिमाचल प्रदेशातून सुरु झाला. नड्डा तीन वेळा हिमाचल प्रदेश विधान सभेत 1993 - 98, 1998 - 2003 and 2007 -2012 या काळात निवडून गेले. तसेच भाजप सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केले. हिमाचल प्रदेशा भाजपाच्या त्यांनी विविध स्तरातील अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या. 

2012 पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. जगत प्रकाश नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मर्जीतले मानले जातात. 2014 साली लोकसभा निवडणुकीत अमित शाह आणि नड्डा यांनी सोबत काम केले होते. 59 वर्षाचे नड्डा अभ्यासू वृत्ती आणि उत्तम वक्तृत्वासाठी ओळखले जातात. 2019 निवडणुकीत ज्वलंत विजय मिळवल्यानंतर अमित शाह केंद्रीय गृह मंत्री झाले. त्यानंतर जून महिन्यात जगत प्रकाश नड्डा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे. पी नड्डा यांनी आरोग्य मंत्री म्ह्णून काम पहिले तसेच ' आयुष्मान भारत योजना ' ही त्यांच्याच कारकिर्दीत सुरु करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत जे.पी नड्डा यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी होती. 

 जगत प्रकाश नड्डा यांना मिळणाऱ्या नवीन जबाबदारीवर नड्डा यांच्या पत्नी डॉ मल्लिका नड्डा यांनी आनंद व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना मल्लिका म्हणाल्या, " हा दिवस आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी तसेच बिलासपूर तसेच हिमाचल प्रदेशच्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. एका लहान राज्यातील व्यक्तीला इतकी मोठी जबाबदारी मिळत आहे. " 

 हिंदुस्थान समाचार


 
Top