राष्ट्रीय

Blog single photo

रस्ते अपघातासंदर्भात जनजागृती करा - नितीन गडकरी

11/01/2020

नागपूर, 11 जानेवारी (हिं.स.) : अपघातांची वाढती संख्या आणि भीषणता पाहता अपघातांस परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील वनामती येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, सर्वश्री आमदार मोहन मते, टेकचंद सावरकर, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे तसेच महामार्ग पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.यावेळी गडकरी म्हणाले की, दरवर्षी देशभरात 5 लाख अपघात होतात तर या अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. 3 लाख लोक या अपघातात गंभीर जखमी होतात. यामुळे 2 टक्के जवळपास जीडीपीचे नुकसान होते. यामध्ये 18 ते 35 वयोगटातील 62 टक्के तरुण मुलांचे प्रमाण आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अपघात सुरक्षाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. जानेवारी ते डिसेंबर 2018 मध्ये जिल्ह्यात 1117 अपघात, 237 मृत्यू आणि जखमींची संख्या 1187 असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जास्तीत जास्त सजग राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य पार पाडावे. यात त्यांनी ब्लॅक स्पॉट, खड्डे दुरुस्ती, रस्ते तयार करणे, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड तयार करणे, दुभाजकाचे व रंगरंगोटीचे काम करणे, वाहतूक साधनांची दुरुस्ती करणे, झेब्रा क्रॉसिंग, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना राबविल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण फारच कमी होईल,असे नितीन गडकरी यांनी सांगितले. अपघातमुक्त शहरासाठी तामिळनाडू राज्याने केलेल्या प्रयत्नांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी केली.
हिंदुस्थान समाचार


 
Top