राष्ट्रीय

Blog single photo

“कलम-370 हटवण्याचा निर्णय ऐतिहासीक”- जनरल नरवणे

15/01/2020

नवी दिल्ली. 15 जानेवारी (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासीक असल्याचे प्रतिपादन सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. सेना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


यावेळी जनरल नरवणे म्हणाले की, उत्तरेकडील सीमेवर शांतता आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळं काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराकडे अनेक पर्याय आहेत, असे सांगत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तसेच दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स ही आमची नीती आहे. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि त्याचा वापर करण्यास आम्ही कदापि कचरणार नाही असे नरवणे यांनी सांगितले. 

सैन्याबाबत बोलताना ते म्हणाले की, लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धाच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप स्थापन करण्यात येत आहे. स्पेस, सायबर, विशेष कारवाया, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरवर भर देण्यात येत आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं नरवणे यांनी सांगितले. लष्करात जाती, धर्म आदींच्या बाबतीत कधीच भेदभाव केला जात नाही. लष्कर हे 'नाम-नमक-निशान'च्या तत्वांचं पालन करताना रक्षण करते. लष्कर यापुढील काळातही देशवासियांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 
हिदुस्थान समाचार


 
Top