राष्ट्रीय

Blog single photo

सोनिया व काँग्रेस दलितांच्या विरोधात का, अनुराग सिंह ठाकूर

03/01/2020

नागपूर, 03 जानेवारी (हिं.स.) : सीएए कायद्यामुळे पाकिस्तान, बंगलादेश आणि अफगाणीस्थानातून प्रताडित होऊन भारातात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. या शरणार्थींमध्ये मोठ्या संख्येने दलितांचा समावेश आहे. असे असताना सोनिया, काँग्रेस सीएए कायद्याला विरोध का करित आहेत असा सवाल केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 


यावेळी सीएए कायद्यावर प्रकाश टाकताना ठाकूर म्हणाले की, सीएए कायदा कुणाचे नागरिकत्त्व हिरावण्यासाठी नसून शोषित, पिडीत, दलितांना नागरिकत्त्व बहाल करण्याकरिता आणण्यात आला आहे. काँग्रेस आणि विरोधक सीएए, एनआरसी आणि एनपीआर यांची सरमिसळ करून देशात भय, भ्रम आणि अफवा पसरवत आहेत. व्होटबँक मजबूत करण्यासाठी विरोधक हा सर्व उद्योग करीत असून देश तोडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. सोनिया आणि राहुल गांधींनी सीएए कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा असे आव्हान ठाकूर यांनी दिले.

सीएएच्या माध्यमातून अफगाणीस्थान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, बौद्ध, शिख, जैन, पारसी आणि ख्रिस्ती धर्मियांना नागरिकता दिली जाणार आहे. पाकिस्तानातील दलित भारतात निघून गेले तर स्वच्छता कोण करणार, असा प्रश्न एका पाकिस्तानी नेत्याने उपस्थित केला होता. त्यानुषंगाने बोलताना ठाकूर म्हणाले की, पाकिस्तानात राहुन या दलितांनी कायम घाण स्वच्छ करावी, अपमान सहन करावा आणि अत्याचार झेलत रहावे असे सोनिया गांधी यांना वाटते का, या दलित बांधवांना भारतीय नागरिकता मिळत असेल तर सोनिया व काँग्रेस त्यावर आक्षेप का घेत आहेत. सोनियांना भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यावर कुणीच त्याला विरोध दर्शवला नव्हता. मग काँग्रेस इतरांच्या नागरिकत्त्वाला विरोध का दर्शवत आहे असा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.

मुस्लीमांनी निश्चित रहावे
 भारताचे सर्व नागरिक समान असून हा देश आणि केंद्र सरकार संविधानावर चालते. आमचे सरकार किंवा कुठलाही कायदा मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. मुस्लीम समाजाने सीएए कायदा समजून घ्यावा आणि इतरांनाही त्याबाबत सांगावे. काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष घृणित राजकारणातून देशात दुफळी निर्माण करीत आहेत. या देशावर इतरांप्रमाणे मुस्लीमांचाही हक्क आहे. त्यामुळे मुस्लीमांनी निश्चित रहावे से आवाहन ठाकूर यांनी केले. 

तुम्ही काय केले असते ?
 सीएए कायद्याचा विरोध करणा-यांवर ठाकूर यांनी घणाघाती टीकास्त्र सोडले. काँग्रेस, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि विरोधकांची नावे घेऊन त्यांनी प्रश्न केला की, जर तुमचे कुटुंब
पाकिस्तानात असते आणि तुमच्या कुटुंबातील लेकी-सुना आणि पत्नीवर बलात्कार केला असता, त्यांचे धर्म परिवर्तन झाले असते व तुम्हाला प्रताडना सहन करावी लागली असती तर अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असते.. ? स्वतःच्या आत्मसन्मानाची रक्षा करण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना इतका विरोध का असा प्रश्न ठाकूर यांनी विचारला. 

सीएए कायदा घटना संमतच 
 सीएए कायद्यामुळे राज्यघटनेच्या कलम 14-ए चे उल्लंघन होत असल्याचा विरोधकांचा युक्तीवाद आहे. त्यासंदर्भात बोलताना ठाकूर म्हणाले की, स्व. इंदिरा गांधी यांनी 1971 साली बांगलादेशी नागरिकांसाठी भारताची दारे उघडली होती. युगांडातील नागरिकांना काँग्रेसच्या शासनकाळात नागरिकता दिली गेली. तसेच श्रीलंकेतील तामिळ शरणार्थींना देखील आमच्या देशात स्थान मिळाले. त्यामुळे काँग्रेसने कुठल्या तरतूदीच्या अंतर्गत हे निर्णय घेतले होते हे स्पष्ट कारावे अशी मागणी ठाकूर यांनी यावेळी केली. 

हिंदुस्थान समाचार


 
Top