राष्ट्रीय

Blog single photo

शेतकरी कर्जमाफी फसवी, जयंत पाटलांचे आकडे चुकिचे- राजु शेट्टी

11/01/2020

नागपूर, 11 जानेवारी (हिं.स.) : महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून जयंत पाटील यांनी विधानसभेत दिलेला 31 हजार कोटी रुपयांचा आकडा चुकीचा असल्याचा घणाघाती आरोप शेट्टी यांनी शनिवारी नागपुरात केला. 


नागपुरातील रवि भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, महाविकास सरकारची कर्जमाफी तकलादू असून 31 हजार कोटी रुपयांचा आकडा चुकीचा आहे. या सरकारचा कर्जमाफीचा हेतू स्वच्छ नसून यांना कर्जमाफी देईचीच नाही. या सरकारने शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शेट्टी म्हणाले की,
जयंत पाटीलांच्या घोषणेनुसार 31 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागणार आहेत. परंतु, कर्जमाफीला असलेली 2 लाख रुपयांची अट आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कर्जाचे वास्तव लक्षात घेता सरकारला या कर्जमाफीसाठी केवळ 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी 31 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची बेरीज करून दाखवावी असे आव्हान यावेळी शेट्टी यांनी दिले. तसेच सरकारचा घटक असलो तरी वेळप्रसंगी शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात शंखनाद करू असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. दरम्यान शेट्टी यांनी आरसीव्हीपी कराराचा विरोध केला असून केंद्र सरकारच्या विरोधातही कठोर शब्दात ताशेरे ओढलेत. 

सिंचन घोटाळ्याची चौकशी व्हावी 
राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात शेट्टी म्हणाले की, सरकार वापरत असलेला पैसा करदात्यांनी दिलेला पैसा आहे. सिंचनाच्या अभावात खरी ससेहोलपट शेतक-यांची होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन भ्रष्टाचार बाहेर आला पाहिजे असे शेट्टी यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top