राष्ट्रीय

Blog single photo

वायएसआर काँग्रेसच्या आमदाराच्या गाडीची तोडफोड

07/01/2020

गुंटूर, 07 जानेवारी (हिं.स.) :राजधानी अमरावतीच्या मुद्द्यावरून होत असलेल्या विरोध प्रदर्शनाचा फटका आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षातील नेत्यांना बसू लागला आहे. मंगळवारी वायएसआर काँग्रेसचे आमदार पिंनेली रामकृष्णा रेड्डी यांच्या गाडीवर गुंटूर जिह्यतील राष्ट्रीय महामार्ग 16 जवळील चिन्ना काकानी गावात हल्ला झाला आणि गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या तीन राजधानी प्रस्तावामुळे राज्यात विविध भागात शेतकरी आंदोलने करीत आहे. यास माजी मुख्यमंत्री चंद्र बाबू नायडू यांच्या पक्षाचे समर्थन प्राप्त झाले आहे. मागील आठवड्यात चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती भागातील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि आंदोलनास समर्थन देत जगन मोहन रेड्डी यांच्यावर टीका केली. 

आंध्रप्रदेशात राजधानी निर्माण कार्यावर नेमण्यात आलेल्या जी एन राव समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री वायएस प्रमुख जगन मोहन रेड्डी यांना सुपूर्द केला आहे. अमरावतीस आंध्रप्रदेशची राजधानी म्हणून कायम ठेवायचे की नाही याबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी जी एन राव समितीचे गठन करण्यात आले होते. जगन मोहन रेड्डी यांच्या निर्णयामुळे सध्याची राजधानी अमरावतीच्या भविष्यबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top