राष्ट्रीय

Blog single photo

भारताला अमेरिकेच्या मार्गाने जावे लागेल- बिपीन रावत

16/01/2020

नवी दिल्ली, 16 जानेवारी (हिं.स.) : दहशतवादाच्या विरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. जोपर्यंत आपण दशहतवाद्याच्या मुळाशी पोहचत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहिल. अमेरिकेने 9/11च्या हल्ल्यानंतर दहशतवाद संपवण्यासाठी जशी कठोर पावले उचलली होती, तशीच भारताला देखील उचलावी लागतील असे प्रतिपादन भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी केले. ते गुरुवारी रायसीना डायलॉग-2020मध्ये बोलत होते. 

 
यावेळी रावत म्हणाले की, जोपर्यंत जगात दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश आहे तोपर्यंत आपल्याला या धोक्याचा सामना करतच राहावा लागेल. आपल्याला यावर निर्णायक रुपात दोन हात करावे लागतील. दहशतवादाविरुद्ध लढाई संपत आलीय, असा आपला कयास असेल तर आपण चूक आहोत. आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होणाऱ्या आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशासोबत मैत्री होऊ शकत नाही. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाला राजकीय स्तरावर धडा शिकवायला हवा. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाला जबाबदार धरले जावे असे रावत यांनी स्पष्ट केले.

तालिबानबद्दल रावत म्हणाले की, दहशतवाद सोडावा या एका अटीवर सर्वांसोबतच शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला हवेत. दहशतवादाला थारा देणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध कठोर कारवाई करायला हवी. 'फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स'  द्वारे अशा देशांना ब्लॅकलिस्ट करणे हा सगळ्यात चांगला उपाय ठरेल असे रावत यांनी सांगितले. हल्ली पाकिस्तानातही दहशतवादाला मिटवण्यासाठी कॅम्प चालवले जात आहेत. कारण पाकिस्तानला कळून चुकले आहे की, त्यांनी पोसलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या जीवावर उठल्या आहेत असे रावत यांनी सांगितले. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top