राष्ट्रीय

Blog single photo

पुढील पाच वर्षात एमएसएमई क्षेत्राची उलाढाल पाच लाख कोटीपर्यंत पोहोचविण्याचे उदीष्ट्य - नितीन गडकरी

06/01/2020

पुणे 6 जानेवारी (हिं.स) : देशाच्या सकल उत्पन्नात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राचे योगदान २९ टक्के आहे. एमएसएमई क्षेत्राव्दारे होणारे ४९ टक्के उत्पादन भारत निर्यात करतो. आत्तापर्यंत एमएसएमई क्षेत्राव्दारे ११ कोटी लोकांना रोजगार मिळाले आहेत.खादीग्रामोद्योगसहीत ग्रामीण उद्योग आणि एमएमएमई क्षेत्राची डिसेंबर २०१९ अखेर ७५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख कोटी रुपयांपर्यंत उलाढाल पोहोचेल असे उदीष्ट्य केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यादृष्टीने कामकाजास सुरूवात केली आहे. अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठ रस्त्यावरील केंद्रीय मधूमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्राला गडकरी यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 
केंद्रातर्फे मधमाशांपासून बनविलेल्या उत्पादनांवर आधारित प्रदर्शनाची तसेच केंद्रातील प्रयोगशाळांची पाहणी केली. तसेच मधूमक्षिका पालनकर्त्यांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले की, कृषी,ग्रामीण आणि दुर्गम भागात (ट्रायबल एरिआ) या ठिकाणी एमएसएमई क्षेत्रासाठी अधिक संधी आहे. त्यामुळे मध,बांबू,इंधन तसेच ळबागा,खादी यासारख्या क्षेत्रातून उत्पादन अधिक वाढविण्यावर केंद्राचा भर आहे. त्यासाठी बायो-टेक्नॉलॉजीचाही उपयोग करण्यात येत आहे.ग्रामीण भागात हनी क्लस्टरही विकसित करत आहोत. ग्रामीण भागाच्या विकासासाठीचा पाच लाख कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा (प्लॅन) केंद्राने बनविला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणा-याला तेथेच रोजगार मिळेल. डाळींब,कांदाही आपण निर्यात करतो. गाईच्या गोमूत्रापासून भारतीय शास्त्रज्ञांनी बॅटरी तयार केली आहे. अशा नवनिर्मितीला कायम प्रोत्साहन राहील.
अशा प्रकारचे संशोधन देशातील प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हे लक्षात घेऊन 
फिशिंग इंडस्ट्रीलाही केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. याकरीता कोचीन येथे सव्वा कोटी रुपये खर्च करून विशेष ट्रॉलर तयार केला आहे. त्यामुळे कोळी बांधवांना त्याचा निश्‍चितच उपयोग होईल. त्यामुळे त्यांचा मच्छिमारी व्यवसायही वाढण्यास उपयोग होईल.आजमितीला फिशिंग इंड्स्ट्रीचे उत्पादन वर्षाला २० हजार कोटी रुपयांचे निर्यात होते. ते १ लाख कोटींवर पोहोचविण्याचे उदीष्ट्य आहे. तसेच सोलर व्दारे सूत विकणे,कपडे तयार करणे. यासाठी देशभरात १३ ठिकाणी सोलर क्लस्टर तयार केली आहेत, अशीही माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
हिंदुस्थान समाचार


 
Top