क्षेत्रीय

Blog single photo

रत्नागिरी : हापूसच्या निर्यातीचा दिल्लीत सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिमाखात शुभारंभ

01/03/2021

रत्नागिरी, १ मार्च, (हिं. स.) : कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याची जगभरातील ग्राहकांना थेट विक्री करणाऱ्या 'Myko' या मँगो टेक प्लॅटफॉर्मचा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले.

कोकणातील १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि कोकण भूमी प्रतिष्ठानने पुढाकार घेत शेतकऱ्यांचा देशातील पहिला 'www.mykofoods.com' डिजिटल स्टार्टअप बनवण्यात आला. हापूसला जीआय मानांकन मिळवून देणारे माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन आज दिल्लीत प्रभू यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आपण स्वतः निर्मिती केलेल्या प्रत्येक उत्पादनाला जीआय टॅगचे मानांकन मिळायला हवे. वर्षभर प्रचंड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला प्राप्त व्हावा तसेच कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे संरक्षण आणि बळकटी मिळायला हवी. Mykoच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून हे सर्व होण्यास निश्चितच मदत होईल, अशा भावना सुरेश प्रभू यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. कोकणातील शेतात पिकलेला हापूस आता थेट मुंबई, पुणे, दिल्ली ते लंडन, युरोप अशा जगभरातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

येत्या काही दिवसांत या ई-कॉमर्स स्टार्टअपद्वारे हापूस आंब्याच्या विक्रीस सुरुवात होईल. यावेळी 'MyKo Foods'च्या सह-संस्थापक राजश्री यादवराव, सुनयना रावराणे आणि सुप्रिया मराठे या तीन महिला उद्योजक, कोकण अॅग्रो एक्सपोर्टचे उद्योजक दीपक परब, 'हिरवळ प्रतिष्ठान'चे अध्यक्ष किशोर धारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्षभर प्रचंड कष्ट करून हापूसची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, ग्राहकांना संपूर्णतः नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसची चव घेता यावी यासाठी हा मँगो टेक प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार होणार असल्याने हापूस आंब्याच्या विक्रीत होणारे बाजारीकरण, भेसळ थांबेल. त्यामुळे हा डिजिटल स्टार्टअप निश्चितच एक क्रांतिकारी पाऊल म्हणावे लागेल, असा विश्वास 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केला.

'आंब्याच्या प्रत्येक पेटीवर क्यूआर कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यावर कोणत्या बागेत हा आंबा पिकला आहे, त्याची लागवड कधी झाली, तो पेटीमध्ये कधी पॅक करण्यात आला अशी सर्व माहिती ग्राहकाला कळेल. तसेच शेतकऱ्याच्या संपूर्ण माहितीसह त्याच्या बागेत आंबा लागवडीसाठी केले जाणारे परिश्रम व्हिडीओद्वारे ग्राहकाला पाहता येईल. या सोशल स्टार्टअपच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हापूस आंबा थेट ग्राहकांपर्यंत नेण्याची चळवळ सुरू केली आहे, असे 'Myko foods'च्या सह-संस्थापक सुप्रिया मराठे म्हणाल्या.

रत्नागिरी, देवगड, केळशी येथील आंबा बागायतदार संघटना, आंबा उत्पादक संघ पुढे आले असून हापूसचा समृद्ध वारसा टिकवण्याची जबाबदारी सर्वांनीच घेतली आहे, असे 'हिरवळ प्रतिष्ठान'चे अध्यक्ष किशोर धारिया यांनी सांगितले. संपूर्ण उपक्रमाला अॅग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (अपेडा) आणि आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहकार्य लाभले आहे. हापूस आंबा संपूर्ण देशाचे वैभव आहे. हे वैभव जगभरात पोहचावे यासाठी अपेडा या उपक्रमात सहभागी आहे, असे अपेडाचे चेअरमन एम. अंगामुथू म्हणाले.

आंबापेटीच्या बुकिंगला आज सुरुवात झाली आहे. मात्र 'Myko'द्वारे होणाऱ्या आंब्याच्या विक्रीचे पहिले पाऊल म्हणून येत्या ५ मार्च रोजी कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याच्या १० पेट्यांचा लिलाव मुंबईत समारंभपूर्वक होणार आहे. या कार्यक्रमाला कोकणातील शेतकरी, आंबा बागायतदार संघटना, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
(हिंदुस्थान समाचार)


 
Top