मनोरंजन

Blog single photo

फिल्मसच्या माध्यमातून दाखवला समाजाचा आरसा

09/09/2019

नाशिक, ९ सप्टेंबर (हिं.स) : एखादे शहर म्हणजे फक्त इमारती, रस्ते असे नसून एक संपूर्ण संस्कृती तिथे नांदत असते. तिथे राहणारी प्रत्येक व्यक्ती त्याचा भाग असते आणि त्याच्या माध्यमातूनच शहर घडते. त्यामुळेच शहराच्या चांगल्या आणि वाईट परिस्थितीला पूर्णपणे तिथले नागरिकच जबाबदार असतात याची जाणीव करून देत आयडीया कॉलेजचा व्हर्टिकल स्टुडिओ पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फिल्मस बनवून नाशिक शहराचा बोलका आरसाच सादर केला. तर एका ग्रुपने उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करत थेट कॉलेजमध्येच शहराची निर्मिती करून अभिनयाच्या माध्यमातून शहरात घडणाऱ्या विविध घटना साकारल्या.

नाशिकमध्ये विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी कॉलेजमध्ये ‘व्हर्टिकल स्टुडिथओ’ आयोजित केला जातो. यंदा ‘आयडीया ऑफ प्लेस’ (Idea Of Place) हा विषय घेऊन अतुल पेठे (पुणे ), अविजीत किशोर (मुंबई ), अभिजीत सौमित्र (पुणे), रोहन शिवकुमार (मुंबई ), सोनम पठाण (दिल्ली) यांच्या मार्गदर्शानाखाली सदरची कार्यशाळा पार पडली. यात विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आणि मान्यवर तज्ञ मंडळीकडे गटाचे नेतृत्व केले.

कुठल्याही बाजारपेठा या त्या शहराचा आत्मा असतो. संपूर्ण शहराची अर्थव्यवस्था त्या बाजारपेठेच्या अवती भवती फिरत असते. नाशिकमधला फुल बाजार, दुध बाजारही याला अपवाद नाहीत. बाजारात एका जागेवर सकाळी फुलवाला त्यानंतर भाजी आणि कपडे विक्रेता माल विकतो. यातून एकाच ठिकाणाहून व्यापार कसा चालतो याचे चित्रण ' बाजार' या फील्ममध्ये करण्यात आले. नुकत्याच येऊन गेलेल्या पूरानंतर नाशिककरांनी लढावय्यी वृत्ती दाखवत लगेचच दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणले. याचे बोलके चित्रण 'अवगत' मध्ये करण्यात आले. Reconnaissanceच्या ग्रुपने नाशिककरांच्या कायमच मनात असलेल्या सार्वजनिक वाचनालय, गोदाघाट या परिसरातल्या नागरीकांच्या भावना समजून घेतल्या. सदरची जागा कशी वाटते, काही आठवणी याबाबतचे चित्रीकरण केले.

अवघ्या काही फूट चौकोनात साकारली 'सिटी'
फ्लिम निर्मितीप्रमाणेच वास्तू शास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा अभ्यास केला जातो. हाच धागा पकडून एका ग्रुपने थेट कॉलेजमध्येच शहराची निर्मिती केली. याहून पुढे जात शहर जे घडते त्याला नागरिकच जबाबदार असतात याचा जिवंतपट सादर केला. यात जागेचा खुबीने वापर करत अवघ्या काही फूट चौकोनात शहर उभारले. अगदी शहरातल्या भूयारी गटारी, इमारती, कचरा, पब आदी सगळ्याच गोष्टीचा यात समावेश करण्यात आला. यासोबतच विद्यार्थ्यांनी अभिनयातून सोशल मीडियावर होणारे आत्महत्याचे चित्रीकरण, स्वछता कर्मचाऱ्याचे जगणे, पब मधला संगीताच्या नावाखाली होणार गोंधळ, धर्मावरून होणारे हिंसाचार, मॉलच्या वस्तूचे वाढते आकर्षण अशा विविध विषय हाताळतांना समाजाचा बोलका आरसाच सादर केला.
हिंदुस्थान समाचार


 
Top