अपराध

Blog single photo

नंदुरबार : पिस्तुलसह जिवंत काडतुस जप्त; दोघांना अटक

12/10/2019

नंदुरबार, १२ऑक्टोबर, (हि.स.) : नंदुरबार शहरात गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जप्त केले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सिमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर बनावट पिस्तुलची खरेदी विक्री होत असल्यामुळे मागील काही वर्षात शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यांमध्ये विनापरवाना अवैधरीत्या शस्त्रे बाळगणे व वाहतुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने व निवडणूक आयोगाच्या सुचनांप्रमाणे निवडणुक काळात कोणताही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होवु देता, विधानसभा निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी अवैधरीतया शस्त्र बाळगणा-यांवर कारवाई करण्याबाबतचे सक्त निर्देश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिले होते. 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक नंदुरबार शहरात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याकामी फिरत असतांना पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना नंदुरबार शहरातील साक्री नाक्याजवळील परीसरात दोन इसम विना परवाना गावठी बनावटीचे पिस्तुल कब्जात बाळगुन फिरत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार साक्री नाका, बागवान गल्ली, काळी मशिद व आजु-बाजुचा परीसर पिंजून काढला. 
साक्री नाका येथील दसरा मैदानाच्या बाजुला कोप-यात २ संशयीत उभे असलेले दिसले. त्यांना ताब्यात घेतले. रामलाल लालदास वळवी (वय ४०) व एक विधी संघर्ष बालक (दोन्ही रा. खामगांव ता.जि. नंदुरबार) या दोघांचा यात समावेश होता. त्यांची अंगझडती घेतली असता रामलाल लालदास वळवी याने पॅन्टच्या उजव्या बाजुस २५ हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्तुल व दीड हजार रुपये किमतीचे ३ जिवंत काडतूस तसेच विधी संघर्ष बालक याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळही दीड हजार रुपये किमतीचे ३ जिवंत काडतुस असा एकुण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिन्दुस्थान समाचार


 
Top