ट्रेंडिंग

Blog single photo

यापुढे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता - पंतप्रधान

31/05/2020

नवी दिल्ली, ३१ मे (हिं.स.) : देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरोना विरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. कोरोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. आजचा ६५ वा 'मन की बात' कार्यक्रम होता.

आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील कोरोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगाने फैलाव होऊ शकला नाही. कोरोनामुळे होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपले जे नुकसान झाले आहे त्याचे आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.

माय लाईफ माय योग विशेष ब्लॉग

मोदी यांनी एका अनोख्या योग स्पर्धेची घोषणा केली. जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारताने जगभरात योग पोहोचवला. योग मंत्रालयाने एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचे आहे, असं मोदी यांनी सांगितले.

आत्मनिर्भर अभियान भारताला नव्या उंचीवर नेईल

मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीनं भरपूर काम झालं आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मेक इन इंडियासह अनेक जण उद्योग सुरू करत आहे.

आपल्या देशातही एकही असा वर्ग नाही जो सध्या कठीण परिस्थितीचा सामना करीत नाही, अडचणीत नाही. या कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. त्यांची अडचण, त्यांचे दुःख, यातना या शब्दांत सांगितल्या जाऊ शकत नाहीत.

कोरोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आज आपण जी दृश्ये पाहत आहोत. यावरुन देशाच्या भूतकाळात काय घडले असेल त्याचे अवलोकन आणि भविष्यासाठी शिकण्याची संधी देखील मिळाली आहे. आज आपल्या श्रमिकांचा त्रासामध्ये आपण पूर्व भागात राहणाऱ्या लोकांचा त्रास, हालअपेष्टा पाहू शकतो. त्या पूर्व भारताचा विकास होणं अत्यंत गरजेचे आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 
Top