राष्ट्रीय

Blog single photo

करोना विरोधातील युद्ध 21 दिवसांचे- पंतप्रधान

25/03/2020

वाराणसी, 25 मार्च (हिं.स.) : करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संवाद साधला. महाभारतातील युद्धात 18 दिवसांनी विजय मिळाला होता. आता करना विषाणूच्या विरोधात 21 दिवसांचे युद्ध लढत असून घरात राहणे हे या युद्धांतील सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचे मोदी यांनी सांगितले. 


यावेळी पंतप्रधान म्हणाले की, महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. आता 130 कोटी जनता या युद्धाचे सारथ्य करीत आहे. जनतेच्या ताकदीवरच करोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकू. या संकट काळात काशी देशाला संयम, समन्वय आणि सहशीलतेचा संदेश देऊ शकते. काशीचा अर्थ कल्याण आहे. महादेवाच्या नगरित हे सामर्थ्य आहे. करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे असेल तर घरातच राहा हाच एकमेव उपाय असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. मला काहीच होणार नाही किंवा कडक उन्हात व्हायरस आपोआप मरेल, असा काहीचा विचार आहे. पण अशा नागरिकांनी गैरसमजातून बाहेर पडून वास्तवाचे गांभीर्य ओळखावे. हा आजार गर्भश्रीमंतांपासून ते गरीबापर्यंत कुणालाही होऊ शकतो. आरोग्याची पूरेपूर काळजी घेणाऱ्यालाही करोनाचा संसर्ग होऊ शकतो. यावरून करोना हा रोग किती भयंकर आहे याची जाणीव सर्वांना होईल असे मोदींनी सांगितले.


सरकार आणि प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना हे कळतेय पण वळत नाही. त्यांनी माहिती व काळजी घ्यायला हवी. पण त्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. सिगारेट, गुटखा किती हानीकारक आहे हे टीव्हीवर दाखवण्यात येते. काही जण हे बघूनही व्यसन बंद करत नाहीत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण घरातच राहणे आणि अंतर ठेवणे आवश्यक आहे. अंतर राखणे हा करोनापासून वाचण्याचा हाच एक उपाय आहे. हॉस्पिटलमध्ये पांढऱ्या पोषाखात असलेले डॉक्टर आणि नर्स हे परमेश्वराचे अवतार आहेत. आपला स्वार्थ सोडून हे सर्व देशसेवत व्यग्र आहेत. त्यांचा सन्मान करा. त्यांच्यावर कुणी हात उचलला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मोदींनी दिली. येत्या 21 दिवसांत प्रत्येक दिवशी 9 गरीब कुटुंबांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
हिंदुस्थान समाचार 
Top