क्षेत्रीय

Blog single photo

शिवसेनेचे 45 आमदार संपर्कात- संजय काकडे

29/10/2019

मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगला असतानाच भाजप खासदार संजय काकडे यांनी मोठे विधान केलेय. शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे काकडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष बनला आहेत. तर शिवसेना 56 जागांवर विजयी झाली आहे. परंतु, मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी शिवसेनेचे 45 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हंटले आहे. राज्यात 1995 साली शिवसेनेला अधिक जागा होत्या. त्यावेळी मनोहर जोशी हे साडेचार वर्ष मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे हे साडेचार वर्ष उपमुख्यमंत्री होती, तसाच फॉर्म्युला कायम राहिल. गेली पाच वर्ष आम्ही जसे सरकार चालवले तसेच यापुढेही चालवावे, अशी त्या आमदारांच्या मनात इच्छा असल्याचे काकडे म्हणाले. तर दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. भाजपाचे 50 आमदार आमच्या संपर्कात असून ते आपल्याला शिवसेनेत घेण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता यावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top