राष्ट्रीय

Blog single photo

“जिव्हाळा कायम ठेवा” सरसंघचालकांचा अप्रत्यक्ष सल्ला

07/11/2019

नागपूर, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून कुरघोडीचे राजकारण करणा-या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना सरसंघचालक डॉ. मोहन भागव यांनी परस्परांबाबत जिव्हाळा कायम ठेवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला. नागपुरातील सायंटिफीक सभागृहात आयोजित स्व. विलास फडणवीस यांच्या स्मृति दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. विलास डांगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सरसंघचालक म्हणाले की, प्रत्येक वेळी जिव्हाळ्याचा प्रतिसाद जिव्हाळ्यानेच मिळेल हे आवश्यक नाही. अनेक वेळा जिव्हाळ्याचा प्रतिसाद तिरस्काराने देखील मिळू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत देखील आपसातला जिव्हाळा आटू न देण्याची शक्ती माणसामध्ये असली पाहिजे. माणसांवर प्रेम करणे ही तपश्चर्या आहे. मात्र, त्यासाठी खूप समजुतदारी लागते, एकमेकांना खूप समजून घ्यावे लागते असेही त्यांनी सांगितले. समाजातून बरेचदा संघाचा उत्तम स्वयंसेवक कोण असा प्रश्न विचारला जातो. त्याचे आपल्या शैलीत उत्तर देताना सरसंघचालकांनी सांगितले की, माणसांची कदर करतो, माणसांमध्ये वावरतो आणि सतत माणसे जोडतो तोच संघाचा उत्तम कार्यकर्ता किंवा स्वयंसेवक ठरतो. संघ ध्येयनिष्ठेसाठी असून ही ध्येयनिष्ठा आत्मियतेशी जोडली आहे. संघाचा मूळ विचारच आत्मियता आणि जिव्हाळा आहे. माणसे जोडणे आणि त्यांच्याबाबत जिव्हाळा ठेवणे हीच संघाची खरी आणि मूळ शिकवण असल्याचे सांगत त्यांनी सत्तेसाठी भांडणा-यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचलेत. 
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सध्याच्या राजकारणात प्रसिद्धीसाठी काम करणारे बरेच लोक असून त्यांच्यात कृत्रिम जिव्हाळा दिसून येतो. संघात कार्यकर्ते जोडण्याची शिकवण दिली जाते. ते विचारधन आणि संस्कार प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी यांनी गडकरी कुटुंबियांच्या पूर्ती सुपर बाजारचे अवलोकन केले. यावेळी काही वेळासाठी गडकरी आणि भागवत यांची छोटेखानी चर्चा देखील झाली. परंतु, यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी काहीच भाष्य केले नाही. 
हिंदुस्थान समाचार


 
Top