खेल

Blog single photo

भाग्यश्री फंड चंद्रपूर महापौर केसरी, संजना बगाडीला राज्य स्पर्धेत सुवर्णपदक

19/02/2020


अहमदनगर, 19 फेब्रुवारी (हिं.स.):- शांतीकुमार फिरोदिया मेमोरीअल फाऊंडेशनने पालकत्व स्विकारलेल्या महिला कुस्तीपटू भाग्यश्री फंड चंद्रपूर येथील महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात चांदीची गदा पटकाविली. तर आळंदी येथे झालेल्या चौथ्या सब ज्युनिअर मुली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत संजना बगाडी हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. दोन्ही महिला मल्ल राज्यस्तरीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत मैदान गाजवत आहेत. भाग्यश्री फंड हिने सलग दुसर्‍यांदा आपल्या उत्कृष्ट खेळाद्वारे चंद्रपूरचा आखाडा गाजवून महापौर केसरीचे विजेतेपद पटकाविले. तिला चांदीची गदा व ५१ हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तसेच संजना बगाडी हिने देखील आळंदीचे मैदान गाजवून चौथ्या सब ज्युनिअर मुली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. या गुणवंत महिला खेळाडूंचे फाऊंडेशनच्या वतीने नरेंद्र फिरोदिया यांनी अभिनंदन करुन पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या. फंड व बगाडी या कुस्तीपटूंनी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरीअल फाऊंडेशनने पाठबळ दिल्याने मोठ्या जबाबदारीने आपण कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवत असून, त्यांचे सहकार्याने प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार 


 
Top