अपराध

Blog single photo

गावठी ७७ बॉम्बबसह शिकारीचे साहित्य जप्त; संशयिताची कोठडीत रवानगी

30/09/2019

सातारा, ३० सप्टेंबर, (हिं.स.) तालुक्यातील अंबवडे बुद्रूक येथे, जंगल क्षेत्राजवळ दोन झोपड्यांची संशयावरून तपासणी करुन वनविभागाच्या फिरत्या पथकाने शिकारीसाठी वापरले जाणारे ७७ गावठी स्फोटके गोळे, तंगुस फासे ३४ मीटर, ३ लगोर, लोखंडी तराजू, पक्षी पकडण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी पिंजरा असे साहित्य जप्त केले. या प्रकरणी एका संशयितास वनाधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.
वनाधिकाऱ्यांना बातमीदारामार्फत गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार, अंबवडे बुद्रूक गावच्या हद्दीत असेल्या दोन झोपड्यांची संशयावरून तपासणी करण्यात आली. त्यावेळी झोपड्यांत शिकारीसाठी वापरले जाणारे 77 गावठी स्फोटके गोळे व इतर साहित्य आढळून आले. कणकेच्या गोळ्यात हे गावठी बाँब लपवून ते जंगल क्षेत्रात रानडुकरांच्या वाटेवर ठेवले जातात. जेणे करुन डुकराने कणकेच्या वासाने त्याला तोंड लावले तर बॉम्बचा स्फोट होऊन डुक्कर मृत होते. या पद्धतीने  रानडुकराची शिकार केली जाते. शिकारीच्या उद्देशाने हे गावठी बॉम्ब तयार केले गेले होते. 
घटनास्थळी तसबीर जहाज गौंड (रा. देवगाव, ता.रिठी, मध्यप्रदेश. हल्ली रा. अंबवडे बुद्रूक) याला अटक करण्यात आली आहे. सचिन डोंबाळे यांनी भारतीय वनअधिनियम 1927 कलम 26 (1) (आय), महाराष्ट्र वननियमावली 2014 नियम 9 (1) (क) (ह) व शस्त्रास्त्र बंदी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक वनसंरक्षक विश्वास भडाळे व वनक्षेत्रपाल शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली परळीचे वनपाल राजू मोसलगी तपास करीत आहेत. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याची वनविभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. 

हिंदुस्थान समाचार


 
Top