अपराध

Blog single photo

तारापूर एमआयडीसी कारखान्यातील स्फोटात 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

11/01/2020

ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एम-2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला, या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह 8 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ही कंपनी पूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जात असे. या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे.

 यासंदर्भातील माहितीनुसार या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाज सुमारे 30 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. डहाणू व पालघर पर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले. या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी व मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये सुमारे 8 कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती असून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 
 हिंदुस्थान समाचार

 
Top