राष्ट्रीय

Blog single photo

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

23/02/2021

नवी दिल्ली,23 फेब्रुवारी (हिं.स.) : प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार करणाऱ्या आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. मोहिंदर सिंग आणि मनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते जम्मूचे रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. जम्मू येथे केलेल्या कारवाईदरम्यान दोन जणांना अटक करण्यात आली. 
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी या दोघांची भूमिका महत्त्वाची होती. लाल किल्ला हिंसाचाराच्या कटाचे ते सूत्रधार होते, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांना आता न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावर तलवार घेऊन हिंसाचारात सामील झालेल्या एकाला अटक करण्यात आली होती. जसप्रीत सिंग नामक व्यक्तीकडून तलवारही जप्त करण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दीप सिद्धू आणि इक्बाल सिंग यांनाही यापूर्वी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी केली जातेय.

हिंदुस्थान समाचार


 
Top