अंतरराष्ट्रीय

Blog single photo

इस्त्रायलची कुरापत काढल्यास गंभीर परिणाम होतील, नेतन्याहूंचा इराणला इशारा

08/01/2020

जेरुस्लेम, 08 जानेवारी (हिं.स.) : अमेरिका-इराण वाद रंगात आला असतानाच आता त्यात इस्त्रायलने उडी घेतली आहे. अमेरिकेचा प्रतिशोध घेण्याच्या नादात इराणने जर इस्त्रायलची कुरापत काढली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलाय. 

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी मारला गेल्यानंतर या दोन्ही देशातला संघर्ष तीव्र झालाय. इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे 80 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणच्या सरकारी वृत्त वाहिनीने केला. 'अमेरिकेचे 80 दहशतवादी मारले' असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेकडून मात्र कोणताही दुजोरा मिळालेला नाही. इराणचा दावा खोडणारी वृत्तेही पुढे येत आहेत. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचा एकही सैनिक ठार झालेला नाही. काही इराकी सैनिक ठार झाले आहेत, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. 
यापार्श्वभूमीवर इस्त्रायलने अमेरिकेची बाजू घेत इराणला डीवचले आहे.
यासंदर्भात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, सुलेमानी हा असंख्य निरपराध लोकांच्या मृत्यूला जबाबदार होता. त्याचा खात्मा केल्याबद्दल राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करायला हवे. नेतन्याहू यांनी अमेरिकेला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. तसेच अमेरिकेला इस्रायलसारखा आणि इस्रायलला अमेरिकेसारखा दुसरा चांगला मित्र नाही, असे नेतन्याहू यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार



 
Top