नाशिक,१३ फेब्रुवारी(हिं.स):- नाशिक
रुग्णालयातून दीड वर्ष वयाची बालिका पळवून नेल्याची घटना घडली आहे. दुपारी दीड
वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रतिभा भोला गौड (वय दीड वर्ष, रा.
ठाणे, मुंबई) असे अपहरण करण्यात आलेल्या बलिकेचे नाव आहे. अपहरण करणारा
संशयित सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या
माहितीनुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी
अपहरण झालेल्या मुलीला घेऊन तिची आई व मावशी आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास
जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या होत्या.रुग्ण दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी
मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलगी झोपल्याने आईने तिला प्रसूती
कक्षाबाहेर झोपवले व आई पुन्हा कक्षात गेली. दुपारी दीडच्या सुमारास आई बाहेर
आल्यानंतर मुलगी दिसली नाही. म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली.मात्र ती आढळून आली
नाही. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर
झोपवून घेऊन जाताना आढळला. घटनेची माहिती झाल्यानंतर तत्काळ यंत्रणा याठिकाणी दाखल
झाली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघून तपासाला गती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास
सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार