खेल

Blog single photo

महिला क्रिकेट : भारताची द. आफ्रिकेवर मात

09/10/2019

नवी दिल्ली, ०९ ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय महिला क्रिकेट संघाने आज, बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय महिला संघाने बडोदा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. प्रिया पुनिया (७५ धावा), जेमिमा रोड्रिग्स (५५ धावा) या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर हा विजय खेचून आणला असून या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात जबरदस्त खेळ करणारी प्रिया पुनिया ही 'मॅन ऑफ द मॅच' ठरली.

सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४५.१ षटकात १६४ धावा करता आल्या. आफ्रिकेच्या संघाला पूर्ण ५० षटके खेळता आली नाही. त्यांचा संघ ४५ षटकातच सर्व बाद झाला. भारतीय संघाला मिळालेले १६५ धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांनी पूर्ण केले. भारतीय संघाने हे आव्हान ४१.४ षटकात पूर्ण करीत आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला. भारतीय फलंदाजासोबतच गोलंदाजांचीही कामगिरी चांगली राहिली. भारतीय संघाकडून झूलन गोस्वामीने तीन, शिखा पांडेय, पूनम यादव आणि एकता विष्ट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. 
मितालीने प्रस्थापित केला विक्रम 
 भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने आज, बुधवारी इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मिताली राज मैदानात उतरताच हा विक्रम तिच्या नावावर झाला. वन-डे करिअरमध्ये तब्बल २० वर्ष पूर्ण करण्याचा विक्रम मिताली राजने केला आहे. सचिन तेंडुलकरच्या नंतर असा विक्रम करणारी मिताली ही भारताची दुसरी खेळाडू बनली आहे. तर जागतिक क्रमवारीत ती चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. सर्वात जास्त वन डे सामने खेळण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिला आहे. सचिन तेंडुलकरचे वन डे करियर २२ वर्ष १९ दिवस इतके आहे. सचिनने डिसेंबर १९८९ साली वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच मार्च २०१२ साली वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मिताली राजने २६ जून १९९९ साली आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून ती अद्याप खेळत आहे. मितालीच्या नावावर आता २० वर्ष १०५ दिवस वन डे करिअरची नोंद आहे. तिने आतापर्यंत २०४ वन-डे सामने खेळले असून ६ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top