राष्ट्रीय

Blog single photo

करोना प्रादुर्भाव : बेपर्वाई प्राणघातक ठरू शकते

24/03/2020

कुठलाही चांगली गोष्ट सांगितली की, त्यावर सरळ-सरळ अंमलबजावणी करायची नाही असा दुर्गुण अच्चयावत सजीवांना आहे. प्रशिक्षणानंतर प्राणी बदलतात, सुधारतात परंतु, पृथ्वीवरील सजीवांमध्ये सर्वात बुद्धीमान असलेला माणूस मात्र, सहजासहजी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो हे अधोरेखित करणारे दुर्दैवी चित्रण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून निदर्शनास येते आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि मार्गदर्शकतत्त्वे यथासंभव प्रत्येकाला दिली जाताहेत. परंतु, दुर्दैवाने आमच्या देशातील अनेकांना त्यांची गंभीरता आणि महत्त्व दोन्ही लक्षात आलेले नाही. हे खेदाने नमूद करावे लागते आहे. करोना विषाणूचा पसरत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता खासगी कार्यालयांना सुटी घोषित करण्यात आलीय. त्यामुळे मिळेल त्या दळणवळाच्या साधनाने लोक आपापल्या गावी परतताना दिसताहेत. परिणामी बस आणि इतर वाहनांमध्ये होणारी गर्दी हे करोना विषाणूच्या फैलावाचे कारण बनण्याची भीती निर्माण झालीय. परंतु, त्याकडे लोकांचे होणारे दुर्लक्ष असेच कायम राहिले तर परमेश्वरच आपला वाली ठरू शकतो. 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 1 लाख 84 हजार लोक करोना संशयित आहेत. सरकारकडे असलेली ही अधिकृत संख्या असली तरी प्रत्यक्षात याहून अधिक लोक करोना संशयित असू शकतात. त्यांची अचूक आकडेवारी कुणालाही सांगता येणार नाही. इतक्या मोठ्या लोकसंख्येचे निरीक्षण आणि नियंत्रण देखील अवघड आहे. त्यामुळे प्रत्येक पावलावर दक्ष राहणे क्रमप्राप्त ठरते. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई किंवा बेंगळुरू अशा मोठ्या महानगरांमधून आपापल्या गावी परतणारे लोक करोना विषाणूचे वाहक बनण्याचा धोका संभवतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत व्हेंटिलेटर्सचे प्रमाण मर्यादित असतानाच इतर राज्यातील छोट्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर्स कुठून आणायचे ? हा निरुत्तर करणारा प्रश्न आहे. करोना विषाणूच्या देशभर सुरू असलेल्या प्रकोपाची व्याप्ती येत्या काळात आणखी वाढली तर त्याच्या कल्पनेनेही अंगावर काटा येतो. उत्तरप्रदेशचे उदाहरण द्यायचे झाल्यास लखनऊ शहरात 85 रुग्णवाहिका आहेत. या रूग्णवाहिका मृतदेह आणि रूग्णांची ने-आण करण्यासाठी 24 तास सज्ज असतात. परंतु, यापैकी केवळ 5 रुग्णवाहिकांच्या कर्मचा-यांकडेच हँडग्लोब्ज, मास्क आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटस (पीपीई) आहेत. शहरांमध्ये जर असे चित्र असेल तर गावांमध्ये असलेल्या आरोग्य असुविधांची कल्पना देखील करवत नाही. 

करोनाच्या संदर्भातील एका संशोधनानुसार एका करोना संक्रमित व्यक्तीमुळे सुमारे 2.6 म्हणजे अडीच लोकांना प्रादुर्भाव होऊ शकतो. इटली आणि स्पेन सारख्या देशांना डोळ्यापुढे ठेऊन झालेले हे संशोधन भारताच्या संदर्भात अधिक भयावह चित्र उभे करते. चीनची लोकसंश्या 143 कोटी असून चीनमध्ये प्रति वर्गकिलोमीटर वर 143 लोक राहतात. याउलट भारताची लोकसंख्या 130 कोटी असली तरी आपल्याकडे प्रति वर्ग किलोमीटर परिसरात 455 लोक वास्तव्यास आहेत. हेच प्रमाण इराणमध्ये 49, फ्रान्समध्ये 122, स्पेनमध्ये 91 आणि अमेरिकेत 35 इतके आहे. करोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 539, चीनमध्ये 3277, स्पेनमध्ये 2311, इराण येथे 1812 आणि फ्रान्समध्ये 860 लोकांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत जगभरात करोना विषाणूमुळे 16 हजाराहून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतीय लोकांनी या सर्व गोष्टी विचारात घेऊन परिस्थितीची भयानकता समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. भारतात वेळीच योग्य ती खबरदारी न घेतल्यास या विषाणूमुळे अतिशय विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतात सुमारे 120 वर्षापूर्वी प्लेगच्या साथीत जशी गावंच्या गावं नष्ट झालीत तशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आमच्याकडून होणारे दुर्लक्ष आणि बेपर्वाई यामुळे हळूहळू आम्ही तशाच संकटाच्या उंबरठ्यावर उभे ठाकलो आहे.


करोना हा प्रामुख्याने फुफ्फुसांचा आजार असून यात सर्वाधिक नुकसान याच अवयवाचे होते. आपल्या फुफ्फुसांना करोनाचे संक्रमण झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. जे लोग दारू, सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करतात अशा लोकांची फुफ्फुसे आधिच कमकुवत झालेली असतात. अशा स्थितीत गाव-खेड्यात हा आजार पसरल्यास तेथील परिस्थिती अधिकच भयावह होऊ शकते. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे 5 करोनाग्रस्तांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे टिशू पेपर, मास्क, डस्टबिन, सॅनिटायझर, हँडग्लोब्ज यापैकी एकही सुविधा उपलब्ध नाही. जर मोठ्या शहरांची ही अवस्था असेल तर गावातील परिस्थिती अधिकच कठीण असू शकते. त्यामुळे करोनाग्रस्तांना गावात येण्यापासून मज्जाव करण्याची गरज आहे. बिहारची राजधानी पटना येथे परदेशातून परतलेल्या एका तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण मुंगेर जिल्ह्यातील्या एका गावातील होता. भारतात आल्यापासून प्रवास करताना आणि गावात जाईपर्यंत त्याच्यामुळे किती लोकांना संसर्ग झाला असेल याची कल्पना देखील करता येणार नाही. परदेशच नव्हे तर मोठ्या शहरांमधून येणा-या प्रत्येकाचे आसोलेशन (एकांतवास) हाच यावर उपाय ठरू शकतो.


आपल्या देशात ज्यावेळी प्लेगची साथ पसरली होती त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी एक “घोषणा पत्र” तयार केले होते. हे घोषणापत्र म्हणजे प्लेगच्या साथीशी कसा लढा द्यावा याची आचारसंहिता होते. मूळ बंगाली भाषेतील या घोषणा पत्राचा हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला होता. तसेच या घोषणापत्रावर काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असा स्वामी विवेकानंदांचा आग्रह होता. करोनाचा आजार हा प्लेगहून अधिक भयानक असून जागरूकता, संयम आणि नियमांचे काटेकोर पालन हाच यावर एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. तेव्हा बेपर्वाई टाळून व्यष्टी ते समष्टी आजारमुक्त व्हावे यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. 

- आर.के. सिन्हा 
 (लेखक ज्येष्ठ संपादक आणि स्तंभ लेखक आहेत) 
Top