मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडला जिलेटिनचा साठा
25/02/2021
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.) : देशातील प्रथितयश उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर गुरुवारी स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
मुंबईतील पेडररोड परिसरात अंबानी यांचे अँटेलिया हे निवासस्थान असून हा परिसर उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. या भागात कायम महागड्या लक्झरी वाहनाची ये-जा सुरू असते. परंतु, या भागात स्कॉर्पिओ कार पार्क झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांना या वाहनाचा संशय आला. दरम्यान वाहनाची तपासणी केली असता त्यात स्फोटके आढळून आलीत. सदर स्कॉर्पियो गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्या असल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीत अंबानींच्या ताफ्यातील गाडी आणि स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा नंबर सारखाच असल्याची माहिती पुढे आलीय.
अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू : शंभूराज देसाई
यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले की, स्फोटके असलेले वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. स्फोटके का ठेवली यांच्या मूळाशी आम्ही जाऊच. पण, तपास सुरु असल्याने सध्यातरी भाष्य करणे चुकीचे आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचं कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार