राष्ट्रीय

Blog single photo

शरद पवार “जाणता राजा” होऊ शकतात का, मुनगंटीवार यांचा सवाल

13/01/2020

मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.) : भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाला विरोध होत असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हंटले जाते. काही लोकांनी शरद पवारांना देखील ही उपाधी दिली आहे. पवारांच्या कार्यकाळात अनेक शेतक-यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे शरद पवारांना जाणता राजा ही उपाधी लागू होऊ शकते का..? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. 


यासंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. परंतु, गोयल यांच्या पुस्तकावरून विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते आणि त्या पुस्तकावरील वाद मिटला होता, अशी आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया' असं काँग्रेसचे लोक म्हणायचे. तसंच इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा मातेशीही करण्यात आली होती. त्याला मात्र कुणीच आक्षेप घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आहे. पण हीच उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. शरद पवारांच्या कार्यकाळात तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हटलेलं चालते का ? त्यांना ही उपाधी लागू होते का ? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले आहेत. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top