राष्ट्रीय

Blog single photo

शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष म्हणजे अराजकतेलाच आमंत्रण - हेमंत महाजन

07/04/2021

मुंबई, ७ एप्रिल (हिं.स.) : जोपर्यंत आक्रमकपणे नक्षलवाद्यंविरोधात त्या त्या संबंधित राज्यांमध्ये सर्व राजकीय पक्षही कारवाई करीत नाहीत, तोपर्यंत नक्षलवाद्यांचा प्रश्न सोडवणे सोपे नाही. त्यांच्याविरोधात केवळ तितकेच थांबता उपयोगाचे नाही. या सशस्त्र नक्षलवादाप्रमाणेच शहरी नक्षलवादही घातक असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी बुधवारी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने बुधवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. छत्तीसगडमध्ये अलीकडे झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये २२ जवानांनी बलिदान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नक्षलवादी, माओवादी आणि त्यांच्या कृत्याबाबत, इतिहासाबाबत तसेच विद्यमान स्थितीबाबत तपशीलवार माहिती दिली.

२०१४ नंतरचा आणि त्यापूर्वीचा काळ असे दोन भाग त्यांनी या नक्षलवादी कारवायांसंबंधात केले. पी. चिदम्बरम यांनी २००९ मध्ये ग्रीन हंट कारवाई सुरू केली मात्र ती नंतर ढेपाळली, कागदावरच राहिली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनीही गृहमंत्री असताना २-३ वर्षांमध्ये नक्षलवाद संपुष्टात आणू असे सांगितले मात्र, तेव्हाही काही जमले नाही. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कारवाईसाठी घोषणा केली आहे, त्यांत यश येवो हीच इच्छा असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नक्षलवादाचा भारतातील इतिहासही त्यांनी सांगितला आणि आता नक्षलवाद विविध राज्यांमध्ये जो पूर्वी पसरला होता, त्यापेक्षा कसा कमी झाला आहे, त्याचेही विवरण त्यांनी केले. नक्षलवाद्यांकडे शस्त्रास्त्रे भरपूर असून त्यांच्याकडे असणाऱ्या दलममध्ये आदिवासी अधिक असून ते काटक असतात, त्यांना जंगलांची माहिती असते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जेव्हा निमलष्करी दले रवाना होतात, तेव्हा त्या मार्गावरील सारी माहिती नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचवली जाते.
महाराष्ट्रात नक्षलवादी शहरी भागात घुसण्याचा प्रयत्न करीत असून शेतकरी आंदोलनातही येण्यासा त्यांचा विचार आहे. त्यांचे हे प्रयत्न रोखायला हवेत, त्यामुळे  देशाचे मोठे नुकसान होते. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचे नुकासान झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारचे नुकसान झाले.

नक्षलवाद्यांचे शहरांमधील समर्थक ट्वीट करून भडकावण्याचे प्रकार करतात. मानवाधिकारवादी वा पर्यावरणवादी म्हणवणारे बुद्धिजिवी जे कोणी नक्षलवादाचे उदात्तीकरण करीत आहेत, डाव्या क्रांतिचे विचार सांगत आहेत, त्यामुळे अराजकतेशिवाय काही हाती पडणार नाही. पांढरपेशा नक्षल समर्थकांचा संविधानाविरोधात असलेला डाव उधळून लावण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

नक्षलवादाची ही समस्या आहे व त्यामुळे देशाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सामाजिक, पायाभूत सुविधा, जमिनी सविकास आदिवासी, जंगल विकास मानसिक स्तरावरील प्रसार अशा विविध प्रकारच्या धोरणांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी विशद केले.

सर्वसमावेशक धोरण हवे आणि देशाने त्यासाठी एकत्र यायला हवे त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये त्या आदिवासींना सामील करून घ्यायला हवे, त्यासाठी मानसिक लढाईतही विजय मिळवायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


हिंदुस्थान समाचार


 
Top