दिल्ली-एनसीआर आणि पंजाबसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
12/02/2021
नवी दिल्ली/चंदीगड, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : राजधानी दिल्ली व पंजाबसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाचे केंद्र अफगाणीस्थानात असून रिश्टर स्केलवर याची तीव्रता 7.5 मोजण्यात आली.
यासंदर्भातील माहितीनुसार पंजाबच्या मोगा, फिरोजपूर आणि चंदीगड आणि राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवलेत. चंदीगडमध्ये भूकंपाचे हादरे बसताच लोक घाबरून घराबाहेर पडलेत. या भूकंपाचे केंद्र अफगाणीस्थानात असून त्याचे परिणाम भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेशात आणि उत्तराखंड येथे जाणवलेत. शुक्रवारी रात्री 10 ते 10.32 वाजेदरम्यान उत्तर भारतात हे धक्के जाणवलेत.पंजाबच्या भंटिंडा येथे सोमवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.48 वाजता देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी होती. परंतु, शुक्रवारी बसलेले भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेचे असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. दरम्यान कुठल्याही जिवीत वा वित्त हानीची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
हिंदुस्थान समाचार