ट्रेंडिंग

Blog single photo

शेतक-यांच्या प्रश्नावर घेतली गडकरींची भेट-अहमद पटेल

06/11/2019

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांनी बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांचे भेट घेतली. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच पटेल यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर गडकरी यांची भेट घेतल्याचे सांगितले. 

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली. पटेल बुधवारी सकाळी दहाच्या सुमारस गडकरींची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचलेत. महाराष्ट्रामधील राजकीय सत्तासंघर्षावर चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांची भेट झाल्याची चर्चा असली तरी या भेटीचा महाराष्ट्रातील राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे पटेल यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे. पटेल हे सोनिया गांधीचे निकटवर्तीय असून ते सध्या काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्याच सल्ल्याने होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा सोडवण्यासाठीच ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. मात्र आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गडकरींची भेट घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पटेल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती, महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार


 
Top