राष्ट्रीय

Blog single photo

मोदींमुळेच काश्मिरातून 370 हटवता आले- अमित शाह

08/10/2019

बीड, 08 ऑक्टोबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्त्वामुळे जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवणे शक्य झाल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, मंगळवारी बीड येथील भगवानगडावर केले. पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. शाह यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर भाजपला विजयी बनवण्याचे आवाहन केले. 

 याप्रसंगी शाह म्हणाले की, देशाच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळवून दिल्या. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्यानंतर अवघ्या 5 महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद 370 रद्द करुन अवघा देश एक केला. त्यांनी मागील 70 वर्षांमध्ये प्रलंबित होते ते निर्णय 5 महिन्यात मार्गी लावले असे सांगत शाह यांनी मोदींचे कौतुक केले. तसेच त्यांचे हे कार्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांमध्ये पोहचवा असेही अमित शाह यांनी सांगितले. 
यवेळी स्व. गोपीनाथ मुंडे आणि भगवानबाबा यांच्या संदर्भात बोलताना शाह यांनी सांगितले की, भगवानबाबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले. तर स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण करत असतानाच समाजातल्या वंचित घटकांसाठी आणि ऊसतोड कामगारांसाठी आयुष्य वेचले. आता या दोघांच्या वाटेवर पंकजा मुंडे वाटचाल करत आहेत. त्याच पंकजा मुंडेंना तुमचा आशीर्वाद हवा आहे तो द्या आणि भाजपाला बहुमताने विजयी करा असे आवाहन अमित शाह यांनी केले. हे राजकीय व्यासपीठ नाही मात्र मला आनंद होतो आहे की महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ हा भगवानगडापासून झाला असेही शाह यांनी सांगितले. दरम्यान भगवानगड या ठिकाणी 370 तिरंगी ध्वज फडकवून आणि 370 तोफांची सलामी देऊन अमित शाह यांना मानवंदना देण्यात आली. 
हिंदुस्थान समाचार


 
Top