मनोरंजन

Blog single photo

पुन्हा तळपणार मराठ्यांची पराक्रमी तलवार, 'पानिपत ' चे ट्रेलर प्रदर्शित

05/11/2019

 मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स) आशुतोष गोवारीकरांच्या बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित 'पानिपत ' चे ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी सुविख्यात असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी 3:14 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पानिपत लढाईतील पेशव्यांचे सामर्थ्य आणि कर्तृत्व रसिकांपुढे मांडले आहे. ट्रेलरवरून चित्रपटाची दिव्यता आणि भव्यता लक्षात येते. स्वतः आशुतोष गोवारीकर यांनी ट्विटर द्वारे ट्रेलर प्रदर्शित केले. पानिपत च्या निमित्ताने पुन्हा मराठ्यांची तळपणारी तलवार बघण्याचे सौभाग्य प्रेक्षकांना लाभणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या लढाईवरील घटनाक्रमांवर आधारित आहे. पानिपत 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिव राव यांची भूमिका बजावणार आहे, कृती सैनन पार्वती बाई तर जेष्ठ अभिनेते संजय दत्त अहमद शाह अबदाली साकारणार आहेत.सोमवारी अर्जुन कपूर , कृती सैनन, आणि संजय दत्त यांचे फर्स्ट लुक पोस्टर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले. 70 आणि 80 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान पुन्हा एकदा सिने-रसिकांच्या भेटीला येणार आहे. पानिपत चित्रपटात झीनत अमान सकीना बेगम यांची भूमिका साकारणार आहेत. तसेच मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापुरे देखील पानिपतमध्ये दिसणार आहेत.

 चित्रपटाचे संगीत अजय-अतुल देणार आहेत तर कला दिग्दर्शक म्हणून भव्य देखावे उभारण्याचे काम नितीन चंद्रकांत देसाई करणात आहेत तर वेशभूषा विभाग नीता लुल्ला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती व्हीजन वर्ल्ड फिल्म्स, रोहित शेलटकर आणि आशुतोष गोवारीकर प्रोडूकशन्स या संस्थांनी केली आहे.  पानिपतचे  फर्स्ट लुक पोस्टर मागिल वर्षी मार्च महिन्यांत प्रदर्शित करण्यात आले होते.

ऐतिहासिक चित्रपट आशुतोष गोवारीकरांसाठी नवीन नाहीत. याआधी त्यांनी ' जोधा अकबर ' आणि ' मोहेंजोदडो ' सारख्या 
 चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र स्वदेश आणि लगान या चित्रपटांनी गोवारीकरांनी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख प्राप्त करून दिली. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top