क्षेत्रीय

Blog single photo

रत्नागिरी : राजापूरमधील व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध

07/04/2021

रत्नागिरी, ७ एप्रिल, (हिं. स.) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे व्यापारीवर्गात असंतोष पसरला आहे. रत्नागिरी आणि राजापूरमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पण निषेध फलक झळकावून शासनाचा निषेध केला.
गेले वर्षभर व्यापारी अडचणीत होते. आता कुठे ते आर्थिक परिस्थितीमधून थोडेफार बाहेर येत असताना पुन्हा लॉकडाउनमुळे ते हादरले आहेत. त्यामुळे आता शासनाने लॉकडाउनबाबत लवकरच योग्य निर्णय घ्यावा. आज व्यापारीवर्गाची परिस्थिती वाईट आहे. एकीकडे लॉकडाउन, दुसरीकडे कर्जाचे ओझे त्यामुळे त्यांना जगणे कठीण झाले आहे. रत्नागिरीत व्यापारी महासंघाकडून त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. पण आता शासनाने अंत पाहू नये. अन्यथा आता व्यापारीवर्गाला उग्र आंदोलन करावे लागेल. सध्या बाजारात अनेक दिवस मंदीच आहे. त्यामध्ये पुन्हा लॉकडाउनच्या संकटात व्यापारी आहे. तेव्हा शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,  अशी मागणी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी केली आहे. आता व्यापाऱ्यांकडून नियमाला धरून आंदोलने केली जाणार आहेत. त्यामध्ये भीक मागो आंदोलन, निषेध फलक तसेच बंदला ठाम विरोध असल्याचे फलक दुकानाबाहेर लावणे, निवेदने देणे अशा आंदोलनांचा समावेश आहे. रत्नागिरीत कालपासून मध्यवर्ती भागात बंदला विरोध असल्याचे फलक व्यापारी महासंघाने लावले आहेत.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मिनी लॉकडाउनमुळे राजापुरातील व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवली असली तरी या निर्णयाविरोधात विरोधाचे फलक झळकावून आपला रोष व्यक्त केला.     अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून विरोध झाला आहे. राजापूर तालुका व्यापारी संघटनेने यासंदर्भात निवेदन देऊन बंदला विरोध दर्शविला होता. या निवेदनामध्ये शनिवार व रविवार रोजी पुकारलेल्या ‘मिशन ब्रेक द चेन' अंतर्गत असलेला लॉकडाउनला संपूर्णपणे पाठिंबा असेल. मात्र संपूर्ण लॉकडाउनला आमचा विरोध राहील, असे नमूद करण्यात आले आहे.  तरीही आज कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मात्र सांयकाळी सर्व व्यापाऱयांनी एकत्र येत बंदला विरोध असल्याचे फलक झळकाविले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी तसेच व्यापारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार


 
Top