
अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : सुमारे १० वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केलेला नाही, अशा ठेवी ‘ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी’ मध्ये हस्तांतरित करण्यात येतात. खातेदारांना त्या परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी निकालीकरणाची कार्यवाही मोहीम स्तरावर पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती बँकर्स व वित्तीय तज्ञांकडून देण्यात आली.
वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँक समिती यांच्या निर्देशानुसार ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत आर्थिक मालमत्तांच्या निकालीकरणासाठी अग्रणी बँकेच्या सहकार्याने नियोजन भवन येथे ’आपला पैसा आपला अधिकार’ जिल्हास्तरीय शिबिर झाले.यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक अधिकारी पंकज कुमार,रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी पीयूष अग्रवाल, अग्रणी जिल्हा प्रबंधक नयन सिन्हा, तसेच वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यात दावा न केलेली खाती 1 लाख 43 हजार 744 इतकी असून, त्याची एकूण जमा रक्कम 42 कोटी रुपये एवढी आहे. शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींबाबत माहिती देण्यात आली तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.यावेळी तुमचे पैसे तुमचा हक्क पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधीअंतर्गत नामनिर्देशित,पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
श्री. अग्रवाल, श्री. सिन्हा यांनी मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे