
अकोला, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आंतरमंडळीय क्रीडा स्पर्धा दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२५ रोजी अकोल्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यांतील अधिकारी आणि कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अऊदा संवसु अकोला मंडळाला यावर्षी यजमानपदाचा मान मिळाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन समारंभ वसंत देसाई क्रीडा संकुल, अकोला येथे दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भट यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून राजेश नाईक मुख्य अभियंता महावितरण अकोला, शरद भगत मुख्य अभियंता महानिर्मिती पारस तसेच संजीव भोळे मुख्य अभियंता महापारेषण अमरावती व रविसिंह ठाकूर राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक हे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, ब्रिज यांसह धावणे, रिले, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे विविध मैदानी खेळ रंगणार आहेत. क्रिकेटचे सामने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होतील. बुद्धिबळ, कॅरम, ब्रिज हे सामने स्काऊट-गाईड कार्यालयाच्या सभागृहात खेळवले जातील. टेबल टेनिस सामने न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला येथे तर उर्वरित मैदानी खेळ वसंत देसाई स्टेडियमवर पार पडतील. दि. ५ नोव्हेंबर रोजी अंतिम सामने होणार असून त्याचे पारितोषिक वितरण दि ७ नोव्हेंबर रोजी संत श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महापारेषण अऊदा संवसु अकोला मंडळाचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता संजय काटकर यांच्यासह आयोजन समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे