
छत्रपती संभाजीनगर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)सणासुदीच्या काळात खाद्यतेलात भेसळ करण्याचे प्रकार वाढत असतात. अन्न व औषध प्रशासन विभागाने माहे ऑगस्टपासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४२ हजार २९४ किलो भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. यासोबतच भेसळयुक्त भगर, तिखट (मिरची पावडर), मसाले आदी पदार्थांचे साठेही जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मालाची किंमत ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये इतकी आहे,अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी श्रीनिवास केदार यांनी दिली आहे.
‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा’, या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात खाद्यतेल ४२२९४ किलो किंमत ८४ लाख ४५ हजार ५३७ रुपये, भरग,मिरची पावडर, मसाले इ. अन्न पदार्थ ५१२२ किलो साठा किंमत ६ लाख २३ हजार ४३६ रुपये. असा एकूण ९२ लाख ९६ हजार ७६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.तेलाचा डबा घेतांना त्यावर असलेली बेस्ट बिफोर ची तारीख पहावी. डबा सिलबंद आहे की नाही याची खात्री करावी. कोणत्या ब्रॅंडचे तेल आहे हे तपासून घ्या. तेलाचा डबा नवीन आहे की जुनाच दिला हे तपासून घ्या. शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधा. तक्रारीसाठी विनामूल्य हेल्पलाईन- १८००११२१००प्रत्येक प्रकारच्या तेलाचे दर वेगवेगळे असतात. त्यामुळे महागड्या तेलात स्वस्त तेल मिसळून भेसळ केली जाते.उदा. शेंगदाणा तेलात सोयाबीन तेल, सुर्यफुल तेलात सोयाबीन तेल, सोयाबीन तेलात पामोलीन तेल मिसळून ग्राहकांना फसवलं जातं. डब्यातले तेल हे नेहमीच वजन करुन घ्यावे, बऱ्याचदा कमी तेल त्यात दिले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis