
कोल्हापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।
हुपरी पोलिस ठाण्याच्या पथकाने हुपरी येथील जुगार अड्डयावर छापा टाकला होता. या कारवाईनंतर संबधितांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पथकातील कॉन्स्टेबलने लाखाची लाच मागीतली तडजोडी अंती ठरलेली ७० हजारांची लाच पंटर रणजित आनंदा बिरांजे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) याच्या मार्फत घेताना हा पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे (रा. कोल्हापूर) याचा एसीबीकडून शोध सुरू असून साप्ताहिक सुट्टीवर असतानाच त्याला या कारवाईची माहिती समजल्याने तो फरार झाला.
एसीबीकडून लाचविरोधी जनजागृती सप्ताह सुरू आहे. याच दरम्यान आज शनिवारी (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास पट्टणकोडोली येथे पंटर बिरांजे याच्या घरीच ही कारवाई झाली.
.एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुपरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संदेश शेटे याने अन्य दोन अंमलदारांसह गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने जुगार खेळणा-या एका व्यक्तीकडे एक लाखाच्या
लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी दिवसभरात तडजोडीअंती ७० हजार रुपये पंटर रणजित बिरांजे याच्याकडे देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिका-यांनी सापळा लावण्याचे ठरवले.
हुपरी पोलिस ठाण्यात पंटरगिरी करणारा बिरांजे याने तक्रारदारास पट्टणकोडोली येथील घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी बिरांजे याच्या घराजवळ सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ त्याला पकडले. पंटरकरवी लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल शेटे हा साप्ताहिक सुट्टी असल्याने पोलिस ठाण्यात मिळाला नाही. कारवाईची चाहूल लागताच तो मोबाइल बंद करून पसार झाल्याची माहिती हुपरी पोलिसांकडून मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar