
धुळे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) | शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमर्या पाडा शिवारात कपाशी पिकाच्या आत गांजा पिकवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणत धुळे पोलिसांच्या एलसीबी पथकाने छापा टाकून तब्बल १२ लाखांचा ६०० किलो गांज्याची झाडे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दोन डांगर पार करीत ३ किलो मीटर पायी जंगलातून वाट काढत ही छापेमारी केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने वाडी सुमर्या पाडा शिवारात छापा टाकण्यात आला. जितू शिकार्या पावरा रा.वाडी ता.शिरपूर हा कसत असलेल्या शेत जमीनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे झाडांची अवैधरित्या लागवड केल्याचे आढळून आले.
येथील तूर आणि कपाशी पिकाच्या आत शेतजमीनीवर अंदाजे ३ ते ५ फुट कमी अधिक उंचीचे गांज्याची झाडे लागवड केले होते. पोलिसांनी सर्व शेतातून ६०० किलोचे गांजाचे झाडे उपटून काढत ताब्यात घेतली. प्रति किलो प्रमाणे एकुण १२ लाख रुपये किंमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच आरोपी जितु शिकार्या पावरा याच्या विरुध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम ८(सी), २०(बी)(एच), २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर