
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय सागरी मत्स्यिकी संशोधन संस्था (ICAR-CMFRI) आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात पाचवी सागरी मत्स्य जनगणना २०२५ हाती घेण्यात येत आहे. हा व्यापक सर्वेक्षण उपक्रम ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या जनगणनेत किनारपट्टीवरील मच्छिमार, नौका, जाळी, मत्स्य बंदरे, मासे प्रक्रिया उद्योग आणि संबंधित व्यवसायांचे सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. या माध्यमातून देशातील सागरी मत्स्य संपत्तीचा अद्ययावत डेटा मिळणार असून, मत्स्य व्यवसायाशी निगडित धोरणनिर्मिती, विकास योजना आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
मच्छिमार समाजाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी तसेच मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी या जनगणनेचा उपयोग होणार आहे. यामुळे मच्छिमारांच्या उपजीविकेला चालना मिळून देशाच्या अर्थविकासाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.
या सर्वेक्षणात तज्ज्ञांची विशेष टीम सागरी किनाऱ्यावरील गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर माहिती गोळा करणार आहे. यामध्ये मत्स्य नौकांचे प्रकार, मच्छिमारांची संख्या, सागरी साधनसंपत्ती, बाजार व्यवस्थापन, तसेच मत्स्य बंदरांची कार्यप्रणाली यांचा समावेश असेल.
या जनगणनेदरम्यान सर्व मच्छिमार, मत्स्य सहकारी संस्था आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी श्री. संजय पाटील यांनी केले आहे.
संपर्क आणि सहभागातून सागरी संपत्तीचे संवर्धन — हाच जनगणनेचा उद्देश!
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके