
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट हा रस्ता वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक झाला असून या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत, अन्यथा 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोरेगाव येथील दुधना नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त सेलूकरांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 बी चे अभियंता यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरातील रायगड कॉर्नर ते रेल्वे गेट हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून, या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात होऊन काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जयसिंग शेळके, विनोद धापसे, मोहन मोरे, कृष्णा पडघन, वसंत आवटे, निशिकांत रोडगे, शाम रोडगे, मारोती ढोले, उध्दव डूबल आणि उत्तम लोखंडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis