
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर तालुक्याच्या सागरकिनारी वसलेल्या कुवेशी येथील प्राचीन व सुप्रसिद्ध श्रीदेव रामेश्वर मंदिरात आजपासून पारंपरिक कार्तिकोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. सकाळी श्रीदेव रामेश्वराची पूजन-विधी, देवाची आरती आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. संध्याकाळी धुपारतीनंतर रात्री कीर्तन, आरती, पालखीभोवती प्रदक्षिणा आणि मध्यरात्री मंत्रपुष्पांजली तसेच दशावतारी संगीत असे या उत्सवाचे स्वरूप आहे. विश्वस्त मंडळाच्या आयोजनाखाली संपूर्ण आठवडाभर पूजा, कीर्तन, पालखी, दशावतारी प्रयोग आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा आणि बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दिनी बलिपूजन व नवस-गाऱ्हाणी होणार आहेत. उत्सवाचा समारोप ६ नोव्हेंबर रोजी सकाळी देवपूजा, दुपारी महाप्रसाद आणि रात्री लिंगायत मंडळींचा पारंपरिक दशावतार प्रयोग याने होणार आहे. या उत्सवात सहभागी होऊन देवदर्शनाचा लाभ घ्यावा आणि श्रद्धेचा हा पारंपरिक सोहळा अधिक भव्यतेने साजरा करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन श्रीदेव रामेश्वर व श्री भरतदुर्गादेवी विश्वस्त मंडळातर्फे सर्व भाविकांना करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी