रत्नागिरी जिल्हा अग्रणी बँकेतर्फे आर्थिक समावेशन शिबिर संपन्न
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) | केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहचावा, या उद्देशाने १ जुलै ते ३१ आॕक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक
जिल्हा अग्रणी बँकेतर्फे कोतवडे येथे आर्थिक समावेशन शिबिर


रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) | केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहचावा, या उद्देशाने १ जुलै ते ३१ आॕक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने, बँक ऑफ इंडियातर्फे (रत्नागिरी जिल्ह्याची अग्रणी बँक) कोतवडे ग्रामपंचायत हद्दीतील परिवर्तन हॉल येथे आर्थिक समावेशन योजनांबाबत तसेच री-केवायसी जनजागृती मोहिमेअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराला भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक एच. एस. वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी री-केवायसी का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल अ‍ॅरेस्ट या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली. त्याप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक बेनज़िर शेख यांनी री-केवायसी आणि निष्क्रिय ठेव मोहिमेबाबत माहिती दिली.

बँक ऑफ इंडियाचे उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांनी प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच निष्क्रिय ठेवी टाळण्यासाठी रीकेवायसी आणि खात्याला वारस असणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियाद्वारे २ लाखांचे दोन दावा धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक एच एस वर्मा यांनी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, बँक ऑफ इंडिया कोतवडे शाखा व्यवस्थापक हरजित सिंग गिल, रत्नागिरी तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर, कोतवडे सरपंच संतोष बारगोडे आणि ग्रामविकास अधिकारी देवीदास इंगळे आदी उपस्थित होते.

शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २०० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्व बँकांच्या बँक प्रतिनिधींनी प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणीसह विविध योजनांमध्ये नावनोंदणी केली. या शिबिराचे आयोजन विजय पाटील, प्रबंधक (वित्तीय समावेशन) आणि त्यांच्या बँक ऑफ इंडिया टीमने केले. शिबिराकारिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमात उपअंचल प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, उपक्षेत्रीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, सरव्यवस्थापक आरडीसीसी, भारतीय स्टेट बँकचे मुख्यप्रबंधक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामुळे स्थानिक लोकांना विविध वित्तीय योजना आणि सेवा समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक (वित्तीय समावेशन) विजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande