
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (RDCA) वार्षिक सर्वसाधारण सभा पेण येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत रायगड जिल्ह्यातील क्रिकेटच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प करण्यात आला.
गतवर्षी नवीन कार्यकारिणी स्थापन झाल्यापासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विविध वयोगटातील खेळाडूंसाठी अनेक स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आल्या. एकूण ३७५ सामन्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव प्रदीप नाईक यांनी सभेत दिली. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेतील १५ दोन दिवसीय सामन्यांचे आयोजन देखील रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने केले होते.
सभेत मागील इतिवृत्त वाचून सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सचिव नाईक यांनी सांगितले की, आरडीसीए आता आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत असून सर्व व्यवहार कॅशलेस आणि पारदर्शक पद्धतीने केले जात आहेत. रायगड जिल्ह्यातील १३ पंच आणि १५ स्कोअरर यांनी एमसीए परीक्षा उत्तीर्ण केली असून, रायगडच्या साची बेलोसे हिने पहिली महिला पंच म्हणून इतिहास रचल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला.
अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले की, “रायगडमध्ये क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. पदाधिकारी, सदस्य, प्रशिक्षक, पंच, स्कोअरर आणि पालक यांनी एकत्र येऊन कार्य केले तर जिल्ह्यातील क्रिकेट नव्या उंचीवर पोहोचेल.”
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्वतःचे स्वतंत्र मैदान मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, मैदान उपलब्ध झाल्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मोठी आर्थिक मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेत जिल्ह्यातील विविध क्लब, अकॅडमी आणि संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके