



* मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.) - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण करण्याचे डाव हाणून पाडण्यासाठी,मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी शनिवारी गिरगाव चौपाटी येथे करण्यात आलेल्या मूक आंदोलनावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, कौशल्य विकास आणि उद्योजकता व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, आ. योगेश सागर, आ. विद्या ठाकूर, आ. संजय उपाध्याय यांच्यासह अनेक आमदार, युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी या मूक आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात अराजक माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोसणा-या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. या आंदोलन करणा-यांमध्ये एखादा सचिन वाझे देखील असू शकतो, असा सावधानतेचा इशारा देत जनतेने डोळसपणे यांचा कुटिल उद्देश, डाव समजावा असे आवाहन त्यांनी केले.
ठाकरे बंधूंवर निशाणा साधत श्री. चव्हाण म्हणाले की हे बंधू वक्त्तृत्वशैलीच्या बळावर जनतेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरून भावनिक आवाहनांमध्ये अडकवून त्यांची दिशाभूल करत आले आहेत. महाराष्ट्राला सर्वात वाईट दिवस ठाकरे बंधूंनी दाखवले. राज्यात महायुती सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्यासाठी होत असलेले प्रकल्प, योजना याकडे डोळे उघडे ठेवून पहा असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळायला हवे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. श्री. फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राची वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल होत आहे असेही श्री. चव्हाण म्हणाले .
मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यावेळी म्हणाले की मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी मविआ नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी मविआला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी म्हणजे हा मोर्चा आहे अशी खिल्ली श्री. साटम यांनी उडवली. समाजात तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे. मतदारांचा अवमान करत मविआ रडीचा डाव खेळत आहे, असेही ते म्हणाले.
कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी हे मूक आंदोलन आहे. विरोधक निवडणूक जिंकले की लोकशाही शाबूत असते मात्र ते हरले की ईव्हीएमवर आरोप करत रान उठवतात. यापुढे विरोधकांची नौटंकी चालणार नाही. लोकांना सत्य सांगण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी हे आंदोलन आहे. 'मविआ' चा हा मोर्चा म्हणजे अस्तित्व दाखवण्याचा शेवटचा प्रयत्न आहे. सत्तेपासून दूर झालेल्या पक्षांचा राजकीय अंत नजिक आला आहे. जनता महायुती सरकारसोबत ठामपणे उभी आहे, असेही श्री. लोढा म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी