नाशिक : आदिवासी जनजाती गौरव दिन 4 हजार गावांमध्ये साजरा होणार
नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी जनजाती गौरव दिन 15 नोव्हेंबररोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी केंद्र सर
4 हजार गावांमध्ये आदिवासी जनजाती गौरव दिन साजरा होणार आदिवासीमंत्री डॉ. उईके ः 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडांची जयंती


नाशिक, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी जनजाती गौरव दिन 15 नोव्हेंबररोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून आदि-कर्मयोगी अभियान राबविण्यात येत आहे. आदि साथी आणि संयोजक हे अभियानाचे मुख्य आधारस्तंभ असून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतुने रामसन्स एम्पायर, देशमाने पेट्रोलपंपाच्या मागे, पिंपळगाव बसवंत येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उद्‍घाटनासाठी आदिवासीमंत्री डॉ. उईके नाशिकमध्ये आले असता भाजपच्या शहर कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडवणीस यांच्या प्रेरणेतून आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सुमारे 25 योजना राबविण्यात येत असून यासाठी 25 विभाग कार्य करीत आहेत. योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सर्वांगीण प्रगती साध्य करण्यात येत आहे. भगवान बिरसा मंुडा यांना धरती आबा ही पदवी देण्यात आली होती. त्याच नावाच्या आधारे धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान राज्यातील सुमारे चार हजार २५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

मंत्री डॉ. उईके पुढे म्हणाले की, ज्या कंपनीला गणवेश देण्याचे कंत्राट दिले होते त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने गणवेश देणे थांबले आहे. मात्र शासन लवकरच न्यायालयात शपथपत्र दाखल करणार असून विद्यार्थ्यांना गणवेश देण्यास परवानगी द्यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे डॉ. उईके यांनी स्पष्ट केले. आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गुरसळ यांनी अद्यापही पदभार स्विकारल्या नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी लवकरच स्वीकारतील असे सांगितले.

आदिवासी विकास विभागासमोर गत 4 महिन्यांपासून रोजंदारी कर्मचारी आंदोलन करीत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन काय करीत आहे या प्रश्नावर डॉ. उईके यांनी अपात्र शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. १२५४ रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी 213 पात्र शिक्षकांना नोकरी प्रदान करण्यात आली आहे. मात्र इतर शिक्षक अपात्र ठरल्याने त्यांना कमी करण्यात आल्याचे डॉ. उईकेंनी सांगितले. त्यांचे आंदोलन हे संविधान आणि लोकशाहीच्या विरूध्द असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मग सरकारचे मंत्री त्यांना भेटायला का जात आहेत आणि अपात्र शिक्षकांनाच कंत्राटी आदेश का देण्यात येत आहे या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande