
रत्नागिरी, 1 नोव्हेंबर, (हिं. स.) : जागतिक हवामान बदलावर चिपळूणमधील विद्यार्थ्यांनी तुर्की आणि रोमानियातील विद्यार्थ्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधला.
पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, अवेळी पडणारा पाऊस, चक्रीवादळे व भूस्खलन या घटनांमुळे हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. या गंभीर विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हरी सुख संस्थेतर्फे “हवामान बदल आणि भावी पिढी” या विषयावर विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे चिपळूण तालुक्यातील मुंढे तर्फे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांना तुर्की व रोमानिया या देशांतील विद्यार्थ्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याची संधी मिळाली. विविध भाषा व संस्कृती असतानाही “वसुंधरा वाचवा” हा एकच संदेश सर्वांकडून उमटला. सुमारे एक तास चाललेल्या या चर्चेमध्ये दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांनी हवामानातील बदल, प्रदूषण, झपाट्याने होणारे औद्योगिकीकरण व त्याचे परिणाम या विषयांवर सखोल चर्चा केली.
या कार्यक्रमात नीलम आजगावकर यांनी दुभाषी म्हणून, तर रोहित जाधव यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने त्यांच्या संवादकौशल्यासह पर्यावरणविषयक जाण वाढल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका वृषाली सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश खेतले, उपाध्यक्ष वैभव खेतले, सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. रोशन निकम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी