
मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। ऊर्जा मंत्रालयाच्या अधीन एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालय, 14 नोव्हेंबर 2025 रोजी बालदिनी मुंबईत चर्चगेट येथे एसएनडीटी महाविद्यालयात ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या(बीईई) चित्रकला स्पर्धा 2025 या वार्षिक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वतता याबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच शाश्वत भविष्यासाठी त्यांच्या कल्पना सर्जनशीलपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी, एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालयाने गेल्या तीन वर्षांतली राज्यातली सर्वाधिक शाळांची यशस्वीरित्या नोंदणी करून सहभागाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक नोंदणी केली आहे. यापूर्वी शाळांनी शालेय स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये अ श्रेणीत(5 वी ते 7वी) 25,729 विद्यार्थी, ब श्रेणीत (8वी ते 10वी) 27,667 विद्यार्थी सहभागी झाले होते.
ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी युवा मनांना यात सहभागी करून घेण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाचा बीईई चित्रकला स्पर्धा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालयाकडे महाराष्ट्रात या स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जी त्यांची सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण व्यवस्थापनाप्रति असलेली बांधिलकी दर्शवते.
हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धनावरील त्यांचे सर्जनशील विचार प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. सहभागी विद्यार्थ्यांना श्रेणी अ (5वी ते 7वी) आणि श्रेणी ब (8वी ते 10वी) या दोन श्रेणींमध्ये विभागले जाईल आणि त्यांना ऊर्जा संवर्धनाशी संबंधित कार्यक्रमाच्या जागेवरच तात्काळ विषय दिला जाईल. या विषयाद्वारे, ते त्यांच्या कलेतून एका स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्याची कल्पना करण्यास प्रेरित होतील.
भारतीय लिपीच्या कलेतील योगदानासाठी ओळखले जाणारे पद्म पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय सुलेखनकार आणि शिक्षक अच्युत रामचंद्र पालव हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असतील. अच्युत पालव, बालदिनाच्या निमित्ताने मुलांना मार्गदर्शन करतील आणि शाश्वत आणि ऊर्जा-कार्यक्षम भारताच्या निर्मितीसाठी त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती व्यक्त करण्यास प्रोत्साहित करतील.
पारितोषिके आणि पुरस्कार
प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने देऊ केलेल्या गुणवत्ता किंवा सहभागाच्या प्रमाणपत्रासह खालील प्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेतः
पहिले बक्षीस: रु. 50,000 (पन्नास हजार रुपये)
दुसरे बक्षीस: रु.30,000 (तीस हजार रुपये)
तिसरे बक्षीस: रु.20,000 (वीस हजार रुपये)
उत्तेजनार्थ बक्षिसे: प्रत्येक श्रेणीतील 10 विद्यार्थ्यांसाठी – प्रत्येकी रु.7,500 (सात हजार पाचशे रुपये)
या बक्षिसांव्यतिरिक्त, एनटीपीसी पश्चिम विभाग-1 मुख्यालय मुंबईत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रेणीतील 50 मुलांसाठी आणि प्रत्येक मुलासोबतच्या दोन पालकांसाठी, एसी तृतीय श्रेणीच्या ट्रेनच्या तिकिटाच्या समतुल्य प्रवास भत्ता देईल. या कार्यक्रमासाठी ललित कलाकार आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार-सदस्यीय परीक्षक मंडळाने केलेल्या काळजीपूर्वक मूल्यांकनातून चित्रे निवडण्यात येतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहभागींना एक कार्यक्रम-स्मरण किट मिळेल, ज्यात एनटीपीसीचा लोगो असलेली बॅकपॅक, पाण्याची बाटली, टी-शर्ट आणि टोपी यांचा समावेश असेल, तसेच त्यांच्या आणि त्यांच्या पालकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाईल.
अ श्रेणी मध्ये पहिले तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी डिसेंबर 14, 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरतील. श्रेणी ब मध्ये, सर्व प्रवेशिकांधून तीन सर्वोत्तम चित्रे राष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी निवडली जातील.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा प्रवास आणि निवास खर्च महाराष्ट्रासाठी नोडल एजन्सी असलेल्या एनटीपीसी पश्चिम विभाग-I मुख्यालयाद्वारे केला जाईल.
हा उपक्रम ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत पद्धतींना महत्त्व देणाऱ्या पिढीची जोपासना करण्याच्या एनटीपीसीच्या अखंड बांधिलकीला प्रतिबिंबित करत आहे, ज्यामुळे तरुण नागरिक भारताच्या ऊर्जा-कार्यक्षम भविष्यात सक्रिय योगदानकर्ते बनण्यास प्रेरित होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule