
रियाद, १२ नोव्हेंबर (हिं.स.). पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्पष्ट केले की, आगामी २०२६ चा फिफा विश्वचषक हा त्याचा शेवटचा असेल. त्याने सांगितले की, त्याची शानदार कारकीर्द आता संपण्याच्या जवळ आली आहे. क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ९५० हून अधिक गोल करणाऱ्या रोनाल्डोने असेही उघड केले की, तो एक किंवा दोन वर्षात फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याची योजना आखत आहे.
सौदी अरेबियातील एका फोरममध्ये व्हिडिओ लिंकद्वारे २०२६ चा विश्वचषक ही त्याची शेवटची स्पर्धा असेल का असे विचारले असता तो म्हणाला, नक्कीच, हो. मी त्यावेळी ४१ वर्षांचा असेन आणि मला वाटते की, तिच योग्य वेळ असेल.
रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या क्लब अल-नासरकडून खेळतो. २०२३ मध्ये क्लबमध्ये सामील झाल्यानंतर त्याने सांगितले होते की तो लवकरच निवृत्त होईल. त्याने आता स्पष्टीकरण दिले आहे की, प्रामाणिकपणे सांगायचे तर, जेव्हा मी 'लवकरच' असे म्हटले तेव्हा माझा अर्थ एक किंवा दोन वर्षांचा होता. मी अजूनही खेळात असेन, पण जास्त काळ नाही.
पाच वेळा बॅलन डी'ओर विजेता रोनाल्डो आता २०२६ मध्ये होणाऱ्या त्याच्या सहाव्या विश्वचषकात खेळण्याचे लक्ष्य ठेवत आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी २००६ च्या विश्वचषकात होती, जेव्हा पोर्तुगाल उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभूत झाला होता.
पोर्तुगाल अद्याप २०२६ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेला नाही. पण आयर्लंडविरुद्धचा विजय त्याचे स्थान निश्चित करू शकतो. रोनाल्डोने २०२२ मध्ये मँचेस्टर युनायटेड सोडले आणि त्यानंतर इतर अनेक स्टार खेळाडू देखील सौदी क्लबमध्ये सामील झाले आहेत.अलिकडच्या वर्षांत क्रीडा आणि मनोरंजनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या सौदी अरेबियाने २०३४ च्या विश्वचषकाचे आयोजन करण्याचा अधिकार देखील मिळवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे