
अमरावती, 12 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यात सोयाबीन, मूग आणि उडीदच्या सरकारी खरेदीसाठी १५ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर आतापर्यंत ८,२४७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून, त्यापैकी ३,९७४ शेतकऱ्यांची पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणी झाली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, या शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. एकूण १५ केंद्रांपैकी ८ केंद्रे नाफेडद्वारे चालवली जातील, तर उर्वरित ७ ठिकाणी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे (व्हीसीएमएफ) खरेदी केली जाईल.
गेल्या अनेक दिवसांपासून खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंतराव वानखडे, सर्व आमदार आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, शेतकऱ्यांना केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार (MSP) रक्कम दिली जाईल. नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ ही खरेदी करणार आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी अजय बिसने यांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाफेड किंवा व्हीसीएमएफने उघडलेल्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही नोंदणी ५ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ती ऑनलाईन पद्धतीने 'पॉस' मशीनद्वारे केली जात आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा सात-बारा उतारा आणि पीकपेरा ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
नोंदणी करताना शेतकऱ्यांची केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. तसेच, नोंदणीनंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी संबंधित केंद्रावर घेऊन यावा, असे आवाहन पणन महासंघाच्या संचालक मंडळासह जिल्हा मार्केटिंग अधिकारी अजय बिसने यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी