अकोला : जानेवारीअखेरीस नरनाळा महोत्सव
अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यव
P


अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत आहे. मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडेल. महोत्सवात नौकाविहार, सफारी, आदिवासी नृत्यकला सादरीकरण, पक्षीनिरीक्षण, गड भटकंती, साहसी खेळ, छायाचित्र प्रदर्शन याबरोबरच अनेकविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे.

महोत्सवाच्या अनुषंगाने जागा निश्चिती, तसेच परिपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून तसा प्रस्ताव तत्काळ पाठवावा. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करावा. स्थानिक कलावंतांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने महोत्सव यशस्वी करावा. स्वयंसेवी संघटनांचा सहभाग मिळवावा. महोत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी व्हिडीओ, माहितीपट, बातम्या, फलक आदींद्वारे सर्वदूर प्रसिद्धी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande