पुरवठा योजनांसाठी 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर
अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।जिल्ह्यातील प्रकल्पातून बिगर सिंचनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी सन 2025-26 साठी शासन मंजूरीनुसार आरक्षण 73.436 दलघमी इतके व आकस्मिक पाणी आरक्षण 16.904 दलघमी आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती सम
पुरवठा योजनांसाठी 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर


अकोला, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।जिल्ह्यातील प्रकल्पातून बिगर सिंचनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी सन 2025-26 साठी शासन मंजूरीनुसार आरक्षण 73.436 दलघमी इतके व आकस्मिक पाणी आरक्षण 16.904 दलघमी आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीकडून एकूण 90.34 दलघमी पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.

अकोला शहरासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून मंजूर आरक्षणाइतके 24.03 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, काटेपूर्णा प्रकल्पातून महान मत्स्यबीज केंद्रासाठी 0.86 दलघमी, तसेच 60 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 5.03 दलघमी, 4 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 1.96, मूर्तिजापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 3.35 दलघमी आणि म. औ. वि. महामंडळासाठी 0.74 दलघमी पाणी आरक्षित आहे.

वाण प्रकल्पातून अकोट शहरासाठी 5.40, तेल्हारा शहरासाठी 1.80, शेगावसाठी 5.27, 84 खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी 10.75, जळगाव जामोदसाठी 1.204 आणि 140 खेडी योजनेसाठी 6.416 दलघमी पाणी आरक्षण आहे.

मोर्णा प्रकल्पातून पातूर शहरासाठी 0.70 दलघमी, देऊळगाव पास्टुल 16 गावे योजनेसाठी 1.91 दलघमी पाणी आरक्षित आहे. आलेगाव-नवेगाव 14 गावे योजनेसाठी निर्गुणा प्रकल्पातून 1.97 दलघमी, लंघापूर 59 खेडी योजनेसाठी उमा प्रकल्पातून 0.70 दलघमी पाणी आरक्षित आहे. पारस औष्णिक केंद्रासाठी मन प्रकल्पातून 16.50 दलघमी पाणी आरक्षित आहे. संत गजानन महाराज संस्थान, शेगावसाठी मन प्रकल्पातून 1 दलघमी, कसुरा बं. येथून 0.75 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले.

पाणी निश्चिती समितीची बैठकही नुकतीच जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. त्यात पाणी आरक्षणाबरोबरच इतर विविध बाबींची चर्चा झाली. यंत्रणांनी पाणी आरक्षणाच्या 50 टक्के रक्कम जलसंपदा विभागात जमा करावी. पाणीपट्टी थकबाकी अदा करावी. मंजूर आरक्षणापेक्षा वाढीव मागणी करणा-या प्रकल्पांनी तसे प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत सक्षम प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यावेत. ई-मीटर लावण्याची कार्यवाही पूर्ण करावी. रब्बी हंगामासाठी सिंचनाचे परिपूर्ण नियोजन करावे, आदी निर्देश देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande